मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या आयोजनासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सर्व पर्यायांची चाचपणी करत आहे. त्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वकरंडक स्थगित होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे आयपीएल आयोजनासाठी बीसीसीआयने दंड थोपटले आहेत. पण, यात पाकिस्तानने खोडा घातला आहे. पाक क्रिकेट बोर्डाने, पाकिस्तान प्रीमिअर लीग खेळवून झाल्यानंतर, ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आशिया चषकाचे आयोजन करण्याचे ठरवत, बीसीसीआयच्या मार्गावर अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे.
कोरोनामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित करण्यात आला आहे. जर हा हंगाम रद्द झाल्यास, बीसीसीआयला ४००० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. यामुळे बीसीसीआय आयपीएलच्या आयोजानबाबत आग्रही आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्व करंडकाचे आयोजन आहे. पण ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डातील अधिकाऱ्यांनी विश्वकरंडकाचं आयोजन करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे. यामुळे बीसीसीआयच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने, आडकाठी केली.
बीसीसीआयने पीसीबीला यंदा पीएसएल न खेळवण्याची आणि त्या तारखांमध्ये आशिया चषक खेळवण्याची विनंती केली. पण पाकिस्तानने की मागणी धुडकावली. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत आशिया चषकाचे आयोजन केले जाईल, असे स्पष्ट केले. पाकिस्तानकडे आशिया चषकाचे यजमानपद असून पाक बोर्ड सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये याचे आयोजन करणार आहे. असे झाल्यास बीसीसीआयसमोर मोठे संकट उभे राहू शकते.
पाकिस्तानात सध्या करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यासाठी यूएई किंवा श्रीलंकेत या स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते, असे वक्तव्य पाक क्रिकेट बोर्डाचे सीईओ वासिम खान यांनी एका मुलाखतीत केले. यामुळे बीसीसीआयसमोरल अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने केलेल्या या विनंतीला पाक क्रिकेट बोर्डाने नकार दर्शवला असून, यंदाचा आशिया चषक त्रयस्थ स्थानावर खेळवण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला बीसीसीआयने दिलेल्या प्रस्तावावर कोणताही विचार केला जाणार नाही. पीएसएलचे आयोजन पुढे ढकलण्याचा कोणताही विचार नाही. त्यामुळे या नवीन पेचावर बीसीसीआय काय उत्तर शोधते हे पाहावे लागेल.
हेही वाचा - अष्टपैलू क्रिकेटपटू कोरी अँडरसनचा सोमरसेटसोबतचा करार रद्द
हेही वाचा - इंग्लंडला रवाना होण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना मिळाली परवानगी