मेलबर्न - आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मागील १२ दिवसांमध्ये २० सामने खेळवण्यात आले आहेत. यात विजेतेपदाच्या शर्यतीत चार संघ राहिले आहेत. आता उद्या (गुरुवारी) उपांत्य फेरीचे सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना भारत आणि इंग्लंड आणि दुसरा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. दरम्यान, भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकून पहिल्यांदाच स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी आतूर आहे.
कोठे होणार सामना -
भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना सिडनीच्या एससीजी मैदानात होणार आहे. भारतासाठी हे मैदान लकी आहे. पण इंग्लंडचा संघ विश्वकरंडक स्पर्धेत भारताविरुद्ध दमदार कामगिरी करताना दिसतो. कारण उभय संघात आतापर्यंत पाच सामने झाले आहे. हे पाचही सामने इंग्लंडने जिंकले आहेत.
कधी होणार सामन्याला सुरुवात -
उद्या (गुरुवार ता. ५ मार्च ) भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून ३० मिनिटाने या सामन्याला सुरुवात होईल.
काय आहे हवामान अंदाज -
सिडनी हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवारी सिडनीत पावसाची दाट शक्यता आहे. सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पावसाने सामना रद्द झाल्यास...
भारतीय संघाने 'अ' गटातून सर्व म्हणजे चारही सामने जिंकले आहेत. या गटातून भारतीय संघ ०.९७९ च्या नेटरेटने ८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. या कारणाने जर इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल होईल आणि इंग्लंडचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात येईल.
असा आहे भारतीय महिला संघ -
- हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, स्मृती मानधाना, जेमिमा रॉड्रिग्स, तानिया भाटिया, शिखा पांडे, पूनम यादव, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, राधा यादव, अरुंधती रेड्डी, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, ऋचा घोष आणि पूजा वस्त्रकार.
असा आहे इंग्लंडचा महिला संघ -
- हिथर नाइट (कर्णधार ), टॅमी ब्युमोंट, कॅथरीन ब्रन्ट, केट क्रास, फ्रेया डेवीस, सोफी एकलेस्टोन, जार्जिया एल्विस, सारा ग्लेन, एमी जोन्स, नताली स्किवर, आन्या श्रुबसोल, मॅडी विलियर्स, फ्रेन विल्सन, लारेन विनफील्ड आणि डेनी वॅट.