माऊंट माउंगानुई - सलामीवीर फलंदाज रेचल हेन्स हिच्या ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंडवर विजय मिळवला. दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी जिंकत तीन सामन्याच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली.
नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ७ बाद २७१ धावा केल्या. यात हेन्सने १०५ चेंडूत आठ चौकारासह ८७ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा संघ ४५ षटकात २०० धावांवर ऑलआउट झाला. हेन्स सामनावीर ठरली. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाचा हा एकदिवसीय क्रिकेटमधील सलग २३ वा विजय आहे.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मेग लेनिंग ४९ आणि एलिसा हेली ४४ तर बेथ मून हिने २६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लीग कासपेरेक हिने सहा गडी बाद केले. तर कर्णधार एमी सॅथरवेट हिने एक गडी टिपला.
न्यूझीलंडकडून एमेलिया केरने सर्वाधिक ४७ धावा केल्या. तर ब्रुक हालीडचे ३२, हेली जेंसन २८ आणि मॅडी ग्रीन हिने २३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासेनने ३, तर जॉजया वारहम हिने दोन गडी बाद केले. टायला वलामिंग आणि मेगन शूट यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. उभय संघातील तिसरा आणि अखेरचा सामना १० एप्रिलला होणार आहे.
हेही वाचा - मुंबई इंडियन्सला फक्त 'हा' संघ देऊ शकतो कडवी टक्कर, 'आकाश'वाणी झाली
हेही वाचा - IPL २०२१ : धोनीचा CSK संघ यंदाही प्ले ऑफ फेरी गाठू शकणार नाही; गंभीरचे भाकित