दुबई - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मंगळवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामना रंगला होता. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या राशिद खानने विक्रम रचला. राशिद खानसारखी कामगिरी या आयपीएलमध्ये कोणालाही करता आली नाही. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात राशिदने चार षटकांमध्ये फक्त सात धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर त्याच्या चार षटकांमध्ये तब्बल १७ चेंडू निर्धाव गेल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत अशी दमदार कामगिरी या आयपीएलमध्ये एकाही गोलंदाजाला करता आलेली नाही.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत राशिद तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने १२ सामन्यात १७ गड्यांना तंबूत धाडलं आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यातील त्याची कामगिरी या हंगामातील सर्वोत्कृष्ट ठरली. त्याने या सामन्यात अजिंक्य रहाणे, शिमरोन हेटमायर आणि अक्षर पटेलला बाद केले.
हैदराबादसाठी करा किंवा मराचा होता सामना -
हैदराबादला स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवण्यासाठी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विजय आवश्यक होता. या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. वॉर्नर-साहा जोडीने केलेली झंझावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी याच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली होती. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना राशिदच्या गोलंदाजीसमोर लोटांगण घातले. दिल्लीला फक्त १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान कायम -
दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी हैदराबादच्या संघाने ११ सामने खेळले होते. यात त्यांना चार विजय मिळवता आले होते, तर सात पराभव पत्करावे लागले होते. पण दिल्लीवर मोठा विजय मिळवत हैदराबादने दोन गुणांची कमाई केली. याशिवाय, त्यांचा रनरेटही चांगलाच वाढला. हैदराबादचे १० गुण झाले असून त्यांनी सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे त्यांचे या आयपीएलमधील आव्हान अजूनही कायम आहे.