मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढाईत १४ एप्रिलनंतरचा काळ निर्णायक असणार आहे, असे मत भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी खेळाडूंसोबत व्हिडिओ कॉल बैठक घेतली. या बैठकीदरम्यान सचिनने आपले मत मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या विविध क्षेत्रातील ४० खेळाडूंची, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठक घेतली. यात त्यांनी, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, चेतेश्वर पुजारा यांच्यासह पी. टी. उषा, पुलेला गोपीचंद, विश्वनाथन आनंद, हिमा दास, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू या नामांकित क्रीडापटूंशी चर्चा केली.
सचिनने बैठकीदरम्यान सांगितले की, 'आपण लॉकडाऊन संपल्यानंतर म्हणजे १४ एप्रिलनंतर निश्चित राहू शकत नाही. उलट यानंतरचा काळ निर्णायक असणार आहे.'
तसेच त्याने पुढे बोलताना सांगितले की, 'मी लॉकडाऊनचे पालन करत आहे. तसेच सोशल डिस्टंन्सही ठेवत आहे. मी सद्या लोकांशी हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून नमस्कार करत आहे. ही सवय मी पुढेही कायम कायम ठेऊ इच्छित आहे.'
दरम्यान, मोदींनी बैठकीत खेळाडूंना कोरोनामुळे भारतात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत मागितली आहे. खेळाडूंच्या बैठकीआधी, मोदींनी आज सकाळी ९ वाजता देशवाशियासाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला. यात त्यांनी रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्व जण ९ मिनिटांसाठी लाईट बंद करून मेणबत्ती, फ्लॅशलाइट, दिवा किंवा मोबाइल फ्लॅश लाईट लावावेत, असे आवाहन केले आहे.
स्मृतीने लग्नासाठी ठेवल्या दोन अटी; वाचा, लव मॅरेज करणारी की अरेंज्ड?
तु सिंगल आहेस? चाहत्याच्या प्रश्नांना स्मृतीचे बिनधास्त उत्तर