दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात सनरायझर्स हैदराबादला प्ले ऑफ फेरीची आशा जिंवत ठेवण्यासाठी राहिलेल्या तीनही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, त्यांना गुणतालिकेत टॉप-३ मध्ये असलेल्या संघांना पराभूत करावे, लागणार आहे. असे असले तरी, आमचा संघ त्या संघांना पराभूत करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केला.
शनिवारी हैदराबादचा सामना पंजाबशी झाला. या सामन्यात फलंदाजांच्या हाराकिरीमुळे हैदराबादने हा सामना १२ धावांनी गमावला. हैदराबादला १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. अखेरच्या क्षणी हैदराबादने १७ धावांमध्ये ७ गडी गमावले.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर वॉर्नर म्हणाला, आम्हाला विश्वास आहे की, आम्ही प्ले ऑफची फेरी गाठण्यास यशस्वी ठरू. आमच्यासाठी पुढील तीनही सामने संघर्षमय असतील. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी आम्हाला काही करून त्या तिनही संघाना पराभूत करावे लागणार आहे. आम्ही राहिलेल्या त्या सामन्यांवर लक्ष्य केंद्रीत करत आहोत.
आमच्यासाठी फलंदाजी हा चिंतेचा विषय ठरला आहे. ही निराशजनक बाब आहे. आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली नाही. पण पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी आम्ही राजस्थानला पराभूत केले होते, असेही वॉर्नरने सांगितले.
दरम्यान, पंजाबला १२७ धावांमध्ये रोखल्याने, वॉर्नरने गोलंदाजांचे कौतूक केले. त्याने सांगितलं की, आमच्या गोलंदाजांनी पंजाबच्या मोठी धावसंख्या उभारण्याचे मनसुबे उधळून लावले.
हेही वाचा - अर्धशतकानंतर राणानं दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी...जाणून घ्या कारण
हेही वाचा - IPL २०२० : धोनीसाठी सन्मानाची लढत, समोर आहे आरसीबीचे 'विराट' आव्हान