नवी दिल्ली - विदर्भ संघाचा अनुभवी क्रिकेटपटू वसीम जाफर रणजी स्पर्धेत १२,००० धावांचा पल्ला गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रणजी करंडक एलिट ग्रुप 'अ 'आणि 'बी' सामन्यात केरळ संघाविरुद्ध मंगळवारी त्याने ही कामगिरी केली. हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे.
हेही वाचा - 'धोनी आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कर्णधार'
अवघ्या चार धावांवर पहिला फलंदाज माघारी गेला असताना जाफर फलंदाजीला आला. त्यानंतर जाफरने हा विक्रम रचला. रणजी स्पर्धेत जाफरने मुंबई व विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९-२० हंगामाच्या आधी, जाफरने या स्पर्धेत ११,७७५ धावा केल्या होत्या.
या मोसमात जाफरने आपला १५० वा रणजी ट्रॉफी सामना खेळून इतिहास रचला होता. १९९६ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा हा क्रिकेटपटू भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये एक 'दिग्गज' खेळाडू म्हणून ओळखला जातो.
वसीम जाफरने भारताकडून ३१ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने १ हजार ९४४ धावा केल्या आहेत. तसेच त्याला २ एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १८ हजार पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. तसेच रणजी ट्रॉफीत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.