नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने निःसंशयपणे काऊंटी क्रिकेटमधून बरेच काही शिकले आहे. परंतू भविष्यात काऊंटी क्रिकेट न खेळता विश्रांती घ्यावी, असा सल्ला अक्रमने बुमराहला दिला. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राशी केलेल्या बातचीतमध्ये अक्रमने आपली प्रतिक्रिया दिली.
अक्रम म्हणाला, "भारतीय खेळाडू वर्षभर क्रिकेट खेळतात. बुमराह सध्या भारताचा जगातील सर्वात अव्वल आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. मी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट होत नसताना विश्रांती घेण्याचा सल्ला देतो. मी पाकिस्तानसाठी सहा महिने आणि लँकेशायरसाठी सहा महिने खेळायचो. पण आजच्या युगात वेळेअभावी हे कठीण झाले आहे."
आपल्या देशासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या अक्रमने टी-20 मधील कामगिरीच्या आधारे गोलंदाजाला तोलणे योग्य नसल्याचे सांगितले. "आपली क्षमता वाढवण्यासाठी तरुण गोलंदाजांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला हवे. टी-20 उत्तम आहे, उत्तम करमणूक आहे. त्यात मजा आहे, पैसा आहे. परंतु मी टी-20 च्या कामगिरीवर गोलंदाजांना तोलणार नाही'', असे अक्रमने म्हटले.