कराची - लॉकडाऊन काळात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) महिला क्रिकेटपटूंसाठी ऑनलाईन सत्र आयोजित केले आहे. या सत्रात एकाग्रतेवर भर दिला जाणार असून महिला क्रिकेटपटूंना दोन दिग्गज खेळाडूंचे मार्गदर्शन मिळणार आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम आणि सध्याचा आघाडीचा फलंदाज बाबर आजम हे या सत्रात सामील होणार आहेत. हे सत्र व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ३५ महिला क्रिकेटपटूंना जोडणार आहे. या क्रिकेटपटूंमध्ये सध्याच्या आंतरराष्ट्रीय आणि उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश असेल. या सत्रामध्ये रणनीती कशी बनवावी, वेगवेगळ्या परिस्थितीत मानसिकता तयार कशी करावी, हे सांगितले जाईल.
पाकिस्तानकडून कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा अक्रम सोमवारी या सत्रात भाग घेणार असून आपला अनुभव सांगणार आहे. अक्रमने पाकिस्तानच्या पुरुष संघाबरोबर असेच सत्र ठेवले होते.
बाबर आजमसमवेत होणाऱ्या सत्रात महिला फलंदाज सहभागी होणार आहेत. आझम हा सध्याच्या युगातील पाकिस्तानचा सर्वश्रेष्ठ फलंदाज मानला जातो. टी -२० क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानावर आहे तर कसोटी सामन्यात तो पाचव्या स्थानावर आहे.