नवी दिल्ली - प्रतिष्ठित अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ अशी आघाडी मिळवली असली तरी स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यापाठी लागलेला टीकेचा ससेमिरा काही संपलेला नाही. चेंडूत फेरफार करण्याच्या प्रकरणाविषयी इंग्लंडचा गोलंदाज स्टीव हार्मिसनने स्मिथबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने डेव्हिड वॉर्नरबद्दल एक खुलासा केला आहे.
हेही वाचा - 'स्मिथने कितीही चांगले प्रदर्शन केले तरी तो चीटर म्हणूनच ओळखला जाईल'
एका वृत्तपत्राला कुकने मुलाखत दिली. त्यामध्ये कुक म्हणाला, 'चेंडूत फेरफार करण्यासाठी वॉर्नर हाताला चिकटपट्टी लावत होता. बीयर पिल्यानंतर वॉर्नरने सांगितले होते की प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो असे करत असे. त्या चिकटपट्टीवर वॉर्नर असा पदार्थ लावायचा जेणेकरुन चेंडूत बदल होईल.'
मागील वर्षी आफ्रिकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱया कसोटीत चेंडूत फेरफार केल्याप्रकरणी स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट यांना शिक्षा झाली होती. एका वर्षापूर्वीच्या सँडपेपर प्रकरणामुळे स्मिथलाही टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या सर्वांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बंदीला तोंड द्यावे लागले होते.
चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय -
ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना 185 धावांनी जिंकत मालिकेत 2-1 अशी बढत घेतली आहे. शेवटच्या दिवशी यजमान इंग्लंड संघाला 383 धावा करावयाच्या होत्या. मात्र इंग्लंडचा संघ 197 धावांवर आटोपला. पहिल्या डावात 211 आणि दुसऱ्या डावात 82 धावांची खेळी करणाऱ्या स्मिथला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.