कोलकाता - भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि बंगाल क्रिकेट संघाचा सल्लागार व्हीव्हीएस लक्ष्मण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बंगालच्या फलंदाजांना मदत करणार आहे. यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फलंदाजांनी केलेल्या चुकांवर लक्ष्मण काम करणार आहे.
कोरोनामुळे भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व स्पर्धा बंद आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) कार्यालय १७ मार्चपासून बंद आहे. लक्ष्मणने खेळाडूंसोबत सत्र आयोजित केले आहे. १३ वर्षानंतर, बंगालने प्रथमच रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश नोंदवला होता. मात्र, त्यांना सौराष्ट्रकडून मात खावी लागली.
कॅबचे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनी सांगितले, “आम्हाला परिस्थितीचा अधिकाधिक उपयोग करायचा आहे. मी सकाळी लक्ष्मणशी बोललो आहे. तो आमच्या फलंदाजांची व्हिडिओ क्लिप पाहणार आहे आणि त्यानंतर खेळाडूंसह चर्चा करेल.”