नवी दिल्ली - भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने अनुभवी स्टार ऑफस्पिनर हरभजन सिंगची स्तुती केली. आपले मत देताना लक्ष्मणने ट्विटरवर भज्जीचा एक जुना फोटो पोस्ट केला. लक्ष्मण सध्या ट्विटरवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो पोस्ट करत असून तो आपली प्रतिक्रिया देत आहे.
लक्ष्मण म्हणाला, "आणखी एक खेळाडू जो आपल्या कारकिर्दीतील आणि वैयक्तिक आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीतून सहजपणे विचलित होऊ शकला असता, मात्र, त्याने संभाव्य निराशेचे आक्रमकतेत रूपांतर केले. हरभजन सिंगने जवळपास दीड दशकापर्यंत आपला सर्वोत्तम स्तर कायम राखला."
2001 साली कोलकाता येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यात लक्ष्मण आणि हरभजन जबरदस्त कामगिरी केली होती. त्या सामन्यात हरभजनने हॅट्ट्रिक नोंदवली. या सामन्यात हरभजनने 13 गडी बाद केले. पहिल्या डावात मागे पडल्यानंतरही भारताने 171 धावांनी सामना जिंकला होता.
काही दिवसांपूर्वी ब्रेट लीने माजी लक्ष्मणचे कौतुक केले होते. तंत्रशुद्ध फलंदाजीमुळे लक्ष्मणला बाद करणे कठीण होते, असे ली म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणने शानदार कामगिरी नोंदवली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 29 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने सहा शतकांसह 2434 धावा केल्या आहेत.