मुंबई - यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा 'अधिक खास' ठरेल, असे भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. यासाठी सेहवागने एक कारण दिले आहे. क्रिकेटपासून दूर असलेला भारताचा महान माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला या स्पर्धेत पाहता येणार असल्यामुळे सेहवाने या आयपीएलला अधिक खास म्हटले आहे.
सेहवाग म्हणाला, "मला वाटते की ही स्पर्धा प्रत्येकासाठी म्हणजेच खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी अधिक विशेष असेल. धोनीला पुन्हा खेळपट्टीवर पाहून नक्कीच आनंद होईल. बरेच काही होईल, मला आणखी बोलण्याची गरज आहे का? लॉकडाउनमध्ये मी माझा वेळ जुने सामने पाहण्यात आणि त्याचे विश्लेषण करण्यात घालवला आहे. क्रिकेट हा आपल्या भारतीयांच्या 'डीएनए' (जीन्स) चा एक महत्त्वाचा भाग असून क्रिकेटच्या पुनरागमनासाठी आम्ही बरीच प्रतीक्षा केली आहे.''
यंदाच्या स्वातंत्र्यदिनी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता मुंबई इंडियन्स या संघात रंगणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचे तेरावे पर्व यूएईत रंगणार आहे. सेहवाग म्हणाला की, क्रिकेट हा भारतीयांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असून क्रिकेटच्या पुनरागमनासाठी चाहत्यांनी बरीच प्रतीक्षा केली आहे.