पुणे - भारताचा कर्णधार विराट कोहली 'रनमशीन' नावाने ओळखला जातो. क्रिकेट खेळताना त्याच्याकडून खोऱयाने धावा होत असतात. मात्र, यंदाच्या वर्षात विराटने एक गोष्ट पहिल्यांदाच करून दाखवली.
हेही वाचा - मयांक अग्रवालची भरारी..! पटकावले सचिन, सेहवागच्या पंक्तीत स्थान
सध्या पुणे येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध आफ्रिका कसोटीत विराट कोहलीने शतक झळकावले. विराटचे हे २६ वे कसोटी शतक आहे. यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये विराटला एकही शतक झळकावता आले नव्हते. त्यामुळे आफ्रिकेविरूद्धचे हे शतक विराटचे यंदाच्या वर्षातील पहिले शतक आहे. २०१९ मध्ये भारताने चार कसोटी सामने खेळले. या सामन्यांत विराटने दोन अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे या वर्षातील त्याचे हे पहिले कसोटी शतक ठरले आहे.
या शतकासह विराटने ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टिव स्मिथच्या कसोटीतील शतकांची बरोबरी केली आहे. विराटने २६ वे शतक झळकावण्यासाठी ८१ तर स्मिथने ६७ सामने खेळले आहेत. शिवाय विराटने भारताचे महान फलंदाज दिलीप वेंगसरकर यांचा विक्रमही मोडित काढला. कसोटी क्रिकेटमध्ये वेंगसरकर यांनी आतापर्यंत ६८६८ धावा केल्या होत्या. कोहलीने मात्र आज त्यांना पछाडले आहे.