दुबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासह, दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा 'सर गॅरफिल्ड सोबर्स' पुरस्कार पटकावला आहे. तर भारताचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दशकातील 'खेळभावना' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
विराट कोहलीने मागील दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३९ शतके आणि ४८ अर्धशतकांसह १० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय ११२ झेल घेणारा कोहली एकमेव फलंदाज आहे. त्यामुळेच विराट कोहलीची दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाली. तसेच दशकातील सर्वोत्तम खेळाडूसाठी दिला जाणारा सर गॅरी सोबर्स पुरस्कारासाठीही विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे.
धोनीला खेळभावना पुरस्कार
महेंद्रसिंह धोनीने २०११ मध्ये नॉटिंघम येथे झालेल्या कसोटी सामन्यात खेळभावना दाखवत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली होती. या सामन्यात पंचानी इंग्लंडचा फलंदाज इयान बेल याला चुकीच्या पद्धतीने धावबाद ठरवले होते. तेव्हा धोनीने मोठे मन करत बेल याला पुन्हा फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यामुळे धोनीला दशकातील सर्वोत्तम ‘खेळभावना’ पुरस्कार मिळाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू ठरला आहे. तर अफगाणिस्तानच्या राशिद खानला दशकातील सर्वोत्तम टी-२० खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आहे. दशकातील सर्वोत्तम महिला एकदिवसीय, टी-२० आणि रेचेल हेयोइ फ्लिंट पुरस्कारावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने नाव कोरले आहे.
हेही वाचा - AUS vs IND : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज तंबूत
हेही वाचा - ICC Awards : विराट दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू; स्मिथची कसोटीत बाजी