नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाचे दोन प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्याविषयी महत्त्वाचे भाष्य केले आहे. बुमराह आणि शमी यांना विराट विश्रांती देऊ इच्छित आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणार्या कसोटी मालिकेसाठी स्वतःला तयार करण्यासाठी विराट या दोघांना विश्रांती देणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बुमराह आणि शमी मर्यादित षटकांच्या मालिकेत काही निवडक सामने खेळतील. आज शुक्रवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला प्रारंभ झाला. ''आयपीएलमध्ये शमी आणि बुमराह संपूर्ण हंगाम खेळले आहेत. त्यामुळे त्यांना विश्रांती देणे आवश्यक आहे. त्यामुळे युवा खेळाडूंनाही संधी मिळेल'', असे विराटने पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शमीने आतापर्यंत १४ सामन्यांत ५३ षटके गोलंदाजी केली आहे. तर बुमराहने १५ सामन्यात ६० षटके फेकली आहेत. विराट म्हणाला, "मी या गोष्टींबद्दल चर्चा केली आहे, जेणेकरुन तरुणांना संधी मिळेल. ते खेळायला उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यासाठी हे उत्तम स्थान आहे. ते त्यांच्या स्वतःच्या खेळाबद्दल आहे. काहीतरी नवीन शिकण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची आणि खेळाला वेगळ्या स्तरावर नेण्याची ही संधी आहे. त्यांचा विकास होणे महत्वाचे आहे आणि त्यांना संधी देणे आमच्यासाठी महत्वाचे आहे."