मुंबई - नुकताच 'बाप'माणूस झालेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. केरळ उच्च न्यायालयाने विराटला एक कायदेशीर नोटीस बजावली आहे. एका ऑनलाईन रमी गेममुळे विराटला ही नोटीस आली असून या गेमचा तो सदिच्छादूत (ब्रँड अँबेसेडर) आहे.
हेही वाचा - वर्ल्ड टूर फायनल्स : सलामीच्या सामन्यात सिंधू गारद
''विराटसारखे सदिच्छादूत हे तरुणांना अशा गेममुळे चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. तिरुअनंतपुरमच्या विनीथ नामक तरुणाचे या गेममध्ये २१ लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे विनीथने आत्महत्या केली. साजेश नावाच्या व्यक्तीला देखील या गेममुळे खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. मी स्वतः देखील ६ लाख रुपये या गेमच्या व्यसनामुळे हरलो. इतरही लोकांना भरपूर नुकसान होत आहे. माननीय न्यायालयाने यात हस्तक्षेप केल्याने मी त्यांचा आभारी आहे'', असे विराटविरोधात याचिका दाखल केलेल्या व्यक्तीने म्हटले आहे.
या याचिकाकर्त्याने पुढे म्हटले, ''सदिच्छादूत तरुणांना या अशा गेमकडे आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. असे गेम लवकरच एक व्यसन ठरतात. मला या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मनोवैज्ञानिकाची गरज भासली. भारतात या गेम्सना बंदी घालण्यात यावी, अशी माझी विनंती आहे.''
विराटव्यतिरिक्त सरन्यायाधीश एस. माणिकुमार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मल्याळम अभिनेता अजू वर्गीस आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री तमन्नाह भाटिया यांनाही या गेममुळे नोटीस बजावली आहे.