पोर्ट ऑफ स्पेन - वेस्ट इंडिज सोबतच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीच्या शतकी आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीने भारतीय संघाला विजयपथावर नेले. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी मात केली. या सामन्यातील शतकवीर कोहलीने श्रेयस अय्यरच्या खेळीचे कौतूक केले आहे.
सामन्यानंतर विराट म्हणाला, 'अय्यरकडे खूप आत्मविश्वास आहे. आणि त्याने माझ्यावरचा दबाव काढला. मी माघारी परतल्यावरही त्याने धावा केल्या.' या सामन्यात अय्यरने 5 चौकार आणि एका षटकारासह ७१ धावा केल्या आहेत.
विराट पुढे म्हणाला, 'आम्ही चांगली फलंदाजी केली. संघाला माझ्या शतकाची गरज होती. आणि अशी खेळी केल्यामुळे मला चांगले वाटत आहे. शिखर आणि रोहित धावा बनवू शकले नाही. पण, आघाडीच्या तीन फलंदाजांपैकी एकजण मोठी धावसंख्या उभारतो. एका वरिष्ठ खेळाडूला पुढे यायची गरज होती. आणि ती संधी मला मिळाली.'
या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत, बुधवारी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.