लंडन - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानचे कौतुक केले आहे. विराट म्हणाला, राशिद सध्याच्या काळातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज असून त्याचा सामना करणे फलंदाजांना कठीण जाणार आहे.
लंडनमध्ये आयसीसीने कर्णधारांसाठी ठेवलेल्या एका कार्यक्रमात राशिद खानवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना विराट म्हणाला की, 'गेली 3 वर्ष मी राशिदला क्रिकेट खेळताना पाहत असून त्याच्याविरुद्ध मला खेळयाचे आहे. त्याचा वेग हा त्याचे मुख्य हत्यार असून फिरकी गोलंदाज असूनही त्याचा चेंडू हा एका वेगवान गोलंदाजासारखा येतो. त्यामुळे त्याला खेळणे फलंदाजांना फार कठीण होऊन बसते. मात्र असे असले तरी विश्वचषक स्पर्धेत मी या मिस्ट्री स्पिनरला खेळण्यास तयार असल्याचे विराट कोहली म्हणाला.'
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाचे नेतृत्व हे गुलबदीन नैबकडे देण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा पहिला सामना 1 जूनला बलाढ्य आणि पाच वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेला 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे.