शारजाह - आयपीएलच्या तेराव्या हंगामात, सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्सचा ८२ धावांनी पराभव केला. या विजयासह बंगळुरूने गुणतालिकेत तिसरे स्थान काबीज केले. एबी डिव्हिलिअर्सने, या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने ३३ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी साकारली. दरम्यान, बंगळुरूच्या विजयानंतर विराट कोहलीने एबी डिव्हिलिअर्सचे कौतूक 'जिनिअस' खेळाडू असे केले आहे.
सामना संपल्यानंतर विराट म्हणाला, खेळपट्टीचा अंदाज पाहून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आमचा प्लॅन १७० च्या जवळपास धावा धावफलकावर लावण्याचा होता. यासाठी आम्हाला चांगली सुरूवात हवी होती. ती फिंच आणि पडीक्कल या जोडीने दिली. त्यानंतर फटकेबाजीची आवश्यक असताना, एबीने ती जबाबदारी यशस्वी पेलली. एबी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा त्याने पहिल्या दोन चेंडूवर सावध फटके मारले. पण त्याने टोलावलेला तिसरा चेंडू पाहून हा खेळाडू काहीही करु शकतो. हे माझ्या लक्षात आले. तो चेंडूवर तुटून पडला. जिनिअस एबीच्या दमदार खेळीच्या जोरावरच आम्हाला १९४ धावापर्यंत मजल मारता आली.
पुढील सामन्यात देखील ही लय कायम राखण्याचा प्रयत्न आमचा असेल, असेही कोहली म्हणाला. दरम्यान, डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली या जोडीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरूने कोलकातासमोर १९५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण कोलकाताच्या फलंदाजांनी बंगळुरूच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्कारली. कोलकाताचा संघ निर्धारीत २० षटकात ९ बाद ११२ धावाच करू शकला. ख्रिस मॉरिस, वॉशिग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत कोलकाताचे कंबरडे मोडले. तर नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि इसुरू उदाना यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद करत त्यांना चांगली साथ दिली.