नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील १२ वर्षांत पहिल्यांदा शतकाशिवाय एक वर्ष पूर्ण केले आहे. २६ डिसेंबरला ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात मेलबर्न येथे दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र, या बॉक्सिंग डे कसोटीत विराट गैरहजर असेल. पितृत्वाच्या रजेसाठी विराट मायदेशी परतणार आहे.
हेही वाचा - Ind Vs Aus: टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर
यावर्षी कोहलीने खेळलेत २२ आंतरराष्ट्रीय सामने -
२००८मध्ये पदार्पणाच्या वेळी कोहलीने शतक न करता वर्ष पूर्ण केले होते. मात्र, त्यावर्षी त्याने केवळ पाच सामने खेळले. पण यावेळी त्याने २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कोरोनामुळे यावर्षी टीम इंडिया जवळपास नऊ महिने सामने खेळलेले नाही. २००९ नंतर प्रथमच कोहलीने २२ पेक्षा कमी सामने खेळले आहेत. यावर्षी त्याने सात अर्धशतके ठोकली आहेत.
कोहलीने २०१९ मध्ये सात शतके आणि १४ अर्धशतके, २०१८ मध्ये ११ शतके आणि ९ अर्धशतके आणि २०१७ मध्ये ११ शतके आणि १० अर्धशतकांची नोंद केली होती. यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कोहली तीन वेळा शतकाच्या जवळ पोहोचला होता. पहिल्या डे-नाईट टेस्टच्या पहिल्या डावात त्याने ७४ धावाही केल्या. मात्र तो धावबाद झाला.
यावर्षी झालेल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ५ अर्धशतके तर कसोटी व टी-२० मध्ये १ अर्धशतक ठोकले आहे.