नवी दिल्ली - सध्या लॉकडाऊनमुळे क्रीडाविषयक उपक्रम बंद आहेत. भारतातील इंडियन प्रीमियर लीग स्पर्धाही (आयपीएल) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. असे असले तरी, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मैदानाबाहेर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
कोरोनाकाळात इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. 12 मार्च ते 14 मे या कालावधीत ही आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. या यादीत कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने प्रायोजक पोस्टद्वारे 3,79,294 पाउंड जमा केले आहेत. या लॉकडाऊन दरम्यान त्याने केवळ तीन पोस्ट केल्या होत्या. प्रति पोस्ट विराटने 1,26,431 पौंड कमावले आहेत.
या यादीमध्ये जगातील स्टार फुटबॉल खेळाडू ख्रिसियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. यावेळी पोर्तुगालच्या खेळाडूने इंस्टाग्रामवर पोस्ट करून 1.8 मिलियन पौंड कमावले आहेत. रोनाल्डोनंतर बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी आणि ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार तिसर्या क्रमांकावर आहे. या दोघांनी अनुक्रमे 1.2 आणि 1.1 मिलियन पौंड कमावले आहेत.