दुबई - विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शनिवारी खेळलेल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात कोहलीने नाबाद ९० धावा केल्या. यासह तो चेन्नईविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला.
कोहलीने १४व्या षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर एक धाव घेत आयपीएलमध्ये ६००० धावा पूर्ण केल्या. तो बंगळुरूकडून चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धाही खेळला आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात कोहलीने ५२ चेंडूत नाबाद ९० धावा केल्या.
शनिवारी आयपीएलमध्ये दोन सामने खेळले गेले. यात चारपैकी तीन कर्णधार अर्धशतक ठोकण्यात यशस्वी ठरले. कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक आणि पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यांनी अर्धशतके झळकावली. तर, बंगळुरू आणि चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यात कोहलीने अर्धशतक ठोकले, पण चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी केवळ १० धावा करू शकला.
चेन्नईविरुद्धचे अर्धशतक हे विराटचे आयपीएलमधील ३८वे अर्धशतक होते. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहेत. त्याने १३२ सामन्यांमध्ये ४६ अर्धशतके ठोकली आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर सुरेश रैना, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तिघे आहेत. सुरेश रैनाने १९३ सामन्यांमध्ये ३८ अर्धशतके ठोकली आहेत. रोहित शर्माच्या नावावर १९४ सामन्यात ३८ अर्धशतके आहेत. तर विराटने ३८ अर्धशतकांसाठी १८३ सामने खेळले आहेत.