दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. या क्रमवारीत विराटने पहिले तर रोहितने दुसरे स्थान कायम राखले आहे.
हेही वाचा - वर्ल्ड टूर फायनल्स : सलामीच्या सामन्यात सिंधू गारद
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन अर्धशतके केली होती. या कामगिरीमुळे विराटचे एकदिवसीय क्रमवारीतील स्थान बळकट झाले आहे. तर, गोलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानी कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता आठव्या स्थानी पोहोचला आहे.
भारताला आता २३ मार्चपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. इंग्लंडचा संघ २०२०मध्ये भारत दौऱ्यावर येणार होता. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता हा दौरा पुढे ढकलण्यात आला. कोरोनानंतर प्रथमच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होतील. यंदा आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात आले होते.
एकदिवसीय सामने (पुणे स्टेडियम) -
- २३ मार्च - पहिला एकदिवसीय सामना.
- २६ मार्च - दुसरा एकदिवसीय सामना.
- २८ मार्च - तिसरा एकदिवसीय सामना.