हैदराबाद - 'ऑनलाइन जुगारा'ला प्रोत्साहन दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत विराटला अटक करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. कोहली व्यतिरिक्त अभिनेत्री तमन्ना भाटियावरही असाच आरोप लावण्यात आला असून तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेन्नईच्या एका वकिलाने मद्रास न्यायालयात ऑनलाइन जुगार खेळण्यावर बंदी घालण्याच्या निर्देशासाठी याचिका दाखल केली होती. ''ऑनलाइन जुगार कंपन्या तरुणांना ब्रेन वॉश करण्यासाठी विराट आणि तमन्नासारख्या नावाजलेल्या व्यक्तींचा उपयोग करत आहेत. त्यामुळे या दोघांनाही अटक करण्यात यावी'', असे या याचिकेत म्हटले गेले आहे. ऑनलाइन जुगारासाठी घेतलेले पैसे परत न मिळाल्यामुळे आत्महत्या केलेल्या युवकाचा संदर्भही या याचिकेत देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे आजकाल ऑनलाइन सामने खेळले जात असून अनेक क्रिकेटपटूंकडून त्यांची जाहिरात केली जाते. विराटही ऑनलाइन गेमला प्रोत्साहन देतो. यंदाच्या आयपीएलची घोषणा झाल्यामुळे विराटही अन्य भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणेच लीगची तयारी करत आहे. या लीगचा पहिला सामना युएईमध्ये 19 सप्टेंबरला खेळला जाईल आणि अंतिम सामना 8 नोव्हेंबरला होईल.