हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळीने भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंच्या मैत्रीबद्दल प्रतिक्रिया दिली. 1991 मध्ये कांबळीने शारजाहमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. तो म्हणाला, ''दोन्ही संघांमध्ये मैदानावर युद्ध होत असले तरी सर्व खेळाडू एकमेकांबद्दल नम्र वागत होते.''
विनोद कांबळी म्हणाला, ''आम्ही जेव्हा पाकिस्तानात जायचो तेव्हा आम्हाला खूप चांगली वागणूक दिली जात होती. खरे तर माझा एक चाहता होता. जो माझ्या कारकिर्दीच्या सुरूवातीपासूनच माझ्यामागे होता. 1991 मध्ये मी पदार्पण केले. तो कराचीचा होता आणि तो मला पत्र पाठवत असे. कारण त्यावेळी मोबाईल नव्हते. अशा परिस्थितीत लोकं केवळ पत्राद्वारे आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवत असत."
ते पुढे म्हणाला, "पाकिस्तानी क्रिकेटपटू राशिद लतीफ हे पत्र माझ्यापर्यंत पोहोचवत असे. तो जेव्हा इथे यायचा तेव्हा तो पत्र घेऊन यायचा. पाकिस्तानात 'फॅन फॉलोईंग' आहे आणि अजूनही आहे. जेव्हा मी खेळायचो आणि निवृत्त झालो, त्यानंतरही 'फॅन फॉलोईंग' तशीच राहिली आहे."
विनोद कांबळीने भारतीय संघासाठी 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2477 धावा केल्या आहेत. आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत, तो नऊ वेळा संघात परतला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. कांबळीने पाकिस्तानविरुद्ध 19 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने 354 धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध त्याची सर्वाधिक धावसंख्या 65 अशी आहे.