जयपूर - कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर मुंबई संघाने विजय हजारे करंडक स्पर्धेत महाराष्ट्राचा सहा गडी राखून पराभव केला. एलिट ग्रुप डी मध्ये समावेश असलेल्या मुंबईचा हा सलग दुसरा विजय आहे. याआधीच्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केला होता.
महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना यश नाहर (११९) आणि अजीम काझी (१०४) यांच्या खेळीच्या जोरावर ९ बाद २७९ धावा केल्या होत्या. महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी करता आली नाही. तो चांगल्या सुरूवातीनंतर १९ धावांवर बाद झाला. यानंतर धवल कुलकर्णीने नौशाद शेख (०), केदार जाधव (५), अंकित बवाने (०) यांना माघारी धाडले. तेव्हा यश आणि काझी यांनी पाचव्या विकेटसाठी २१४ धावांची भागिदारी केली. मुंबईकडून वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने ४४ धावात ५ गडी बाद केले.
महाराष्ट्राने विजयासाठी दिलेल्या २८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाला चांगली सलामी मिळाली. यशस्वी जैस्वाल (४०) आणि पृथ्वी शॉ (३४) या दोघांनी ६७ धावांची सलामी दिली. यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. त्याला सूर्यकुमार यादव २९ आणि शिवम दुबे याने ४७ धावा काढत चांगली साथ दिली. अय्यरने ९९ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १०३ धावांची खेळी केली. मुंबईने हा सामना ४७.२ षटकात ४ गड्याच्या मोबदल्यात जिंकला.
विजय हजारे करंडक स्पर्धेतील अन्य निकाल -
नितीश राणा आणि ध्रुव शोरे यांच्या शतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने पाँड्डिचेरीचा १७९ धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात हिमाचल प्रदेशने राजस्थान संघाचा चार गडी राखून पराभव केला.
हेही वाचा - 'तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट', नटराजनने शेअर केला लेकीसोबतचा फोटो
हेही वाचा - IND vs ENG: डे-नाइट कसोटीत प्रथमच भारत आणि इंग्लंड आमने-सामने; गुलाबी चेंडूवर अग्निपरीक्षा