लाहोर - पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांनी क्रिकेटपटू उमर अकमलवरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ''अकमलने अधिकृतपणे स्वत: ला मूर्खांच्या गटात समाविष्ट केले आहे. अशा लोकांना तुरूंगात टाकले पाहिजे'', असे राजा यांनी म्हटले.
फिक्सिंगसंबंधी न कळवल्याबद्दल उमर अकमलवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तीन वर्षासाठी बंदी घातली. त्यांच्या विरोधातली ही बंदी क्रिकेटच्या सर्व स्वरूपात लागू असेल. उमर अकमल आता तीन वर्षे क्रिकेटपासून दूर राहणार आहे.
रमीझ यांनी ट्विटरवर म्हटले, "तर, अकमलदेखील अधिकृतपणे मूर्खांच्या गटामध्ये सामील झाला आहे. तीन वर्षाची बंदी. गुणवत्ता वाया गेली. पाकिस्तान आता मॅच फिक्सिंगला गुन्हा ठरवत आहे. त्यामुळे अशा लोकांना तुरूंगात टाकायला हवे. "
पाकिस्तानकडून 16 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 84 टी-20 सामने खेळणार्या उमर अकमलने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते, की भारताविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्यासाठी आपल्याला पैशाची ऑफर मिळाली होती.