साऊथम्प्टन - इंग्लंड संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध 8 जुलैपासून होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना खेळला. बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांच्या नेतृत्त्वाखालील संघात खेळवण्यात आलेला हा सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे सर्वोत्तम फॉर्मात असलेले इंग्लंडचे खेळाडू कसोटी मालिकेसाठी सज्ज आहेत.
प्रथम फलंदाजी करताना बटलरच्या संघाने पाच विकेट गमावत 287 धावांवर डाव घोषित केला. जेम्स ब्रेसी आणि डॅन लॉरेन्स यांनी अर्धशतकी खेळी साकारली. तर, स्टोक्सकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटन यांनी गोलंदाजी केली.
प्रत्युत्तरात खेळताना स्टोक्सच्या संघाने 233 धावा केल्या. या डावात जोफ्रा आर्चर, ओली रॉबिन्सन आणि डोम बेस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 54 धावांची आघाडी घेत बटलरच्या संघाने दुसऱ्या डावात सहा गडी गमावत 200 धावा फलकावर लावत डाव घोषित केला. या डावात ओली पोपने नाबाद 55 धावा केल्या. तसेच ख्रिस वोक्स आणि कर्णधार बटलर यांनीही उत्कृष्ट खेळी खेळली.
त्यानंतर स्टोक्सच्या संघाला 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. जॉनी बेअरस्टोने 39 धावांची सलामी दिली. कर्णधार स्टोक्स 33 धावा करून नाबाद राहिला.