परभणी - जिल्ह्यातील पूर्णा शहरात 3 सट्टेबाजांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. शहरातील मध्यवस्तीत चालणाऱ्या या अड्ड्यावर आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील फायनल सामन्यावर सट्टा लावला जात होता.
पूर्णा येथील महावीर चौकातील एका दुकानाच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत हा आयपीएल क्रिकेटवर सुरू असलेल्या सट्टा-जुगारावर चालत होता. पूर्णा पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून रोख 1 लाख 18 हजार 860 रुपयांसह इतर साहित्य असा एकूण 2 लाख 27 हजार 130 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्सच्या फायनलवर सट्टा -
पूर्णाच्या कमल टॉकीजजवळील महावीर चौकातील एका साडी सेंटरच्या वरच्या मजल्यावर आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील फायनल सामन्यावर लोकांकडून पैसे घेऊन सट्टा लावला जात असल्याची माहिती पूर्णा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ, फौजदार मारकवाड व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे अमोल ऊर्फ सचिन रामराव वाघमारे, कृष्णा राजाराम ओझा, रामप्रकाश श्रीनिवास धूत, मनमोहन ऊर्फ गोलू विजयप्रकाश धूत (सर्व रा. पूर्णा) हे आयपीएलच्या फायनल मॅचवर पैसे घेऊन सट्टा लावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून रोख 1 लाख 18 हजार 860 रुपयांसह सट्टा जुगारासाठी वापरण्यात येत असलेले सर्व साहीत्य जप्त केले. या साहित्यात एक लॅपटॉप, माऊस, की-बोर्ड, एलसीडी टीव्ही, कॅल्क्युलेटर, डिजिटल केबल रिसिव्हरसह तब्बल 11 मोबाईलचा समावेश आहे. या कारवाईत एकूण 2 लाख 57 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - परभणीच्या गंगाखेडमध्ये 9 लाखांचा गांजा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
हेही वाचा - परभणी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला; ११ अंश सेल्सिअस तामनाची नोंद