नवी दिल्ली - २०१५च्या वर्ल्ड कपनंतर दुखापतीतून पुनरागमन करताना तीन वेळा आत्महत्या करण्याचा विचार केला होता, असा धक्कादायक खुलासा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने केला आहे. शमीने इन्स्टाग्रामवर रोहित शर्माशी बोलताना ही माहिती दिली.
शमी म्हणाला, “२०१५ वर्ल्ड कपमध्ये मला दुखापत झाली होती. त्यानंतर मला संघात परत येण्यास १८ महिन्यांचा कालावधी लागला आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दौरा होता. पुनर्वसन आणि नंतर कौटुंबीक समस्या किती कठीण आहे हे आपणास माहित आहे. हे सर्व चालूच होते आणि त्यादरम्यान आयपीएलच्या १०-१२ दिवस आधी माझा अपघात झाला. माझ्या वैयक्तिक बाबींबद्दलही माध्यमांमध्ये बरेच काही चालले होते.”
कुटुंबाने दिलेला पाठिंबा महत्त्वाचा असल्याचेही शमी म्हणाला आहे. “मला वाटते की मला माझ्या कुटुंबाची साथ मिळाली नसती तर मी क्रिकेट सोडले असते. मी तीन वेळा आत्महत्या करण्याचा विचार केला. माझ्यावर नजर ठेवण्यासाठी माझ्या कुटुंबातील एखाद्याला माझ्या शेजारी बसावे लागले. माझे घर २४व्या मजल्यावर होते आणि मला वाटायचे की मी अपार्टमेंटमधून उडी मारली पाहिजे”, असेही शमी म्हणाला.
शमी पुढे म्हणाला, “परंतु माझे कुटुंब माझ्याबरोबर होते आणि यापेक्षा काहीही अधिक शक्तिशाली असू शकत नाही. ते मला सांगत होते की प्रत्येक समस्या सोडवली जाते आणि फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित कर. सरावाच्या वेळी मला वाईट वाटायचे आणि माझे कुटुंब मला लक्ष केंद्रित करण्यास सांगायचे. माझा भाऊ माझ्याबरोबर होता. माझे काही मित्र माझ्याबरोबर होते आणि मी ते कधीही विसरणार नाही. जर ते लोक नसते तर मी काहीतरी भयंकर केले असते.”