विशाखापट्टणम - डीन एल्गारची दीडशतकी आणि क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिका संघाने भारताला दमदार प्रत्युत्तर दिले आहे. तिसऱ्या दिवसअखेर पाहुण्या संघाच्या ८ बाद ३८५ धावा झाल्या असून ११७ धावांनी आफ्रिका पिछाडीवर आहे.
हेही वाचा - कुस्तीपटू काकासाहेब पवारांनी शिष्यालाच केलं जावई, राहुल आवारेशी लावणार मुलीचा विवाह
कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि एल्गारने संघाचा डाव सावरल्यानंतर डी कॉकच्या शतकी धावांच्या खेळीने संघाला साडेतीनशेचा टप्पा गाठता आला. डीन एल्गारने २८७ चेंडूंचा सामना करताना १८ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने १६० धावा केल्या. त्याला फिरकीपटू रविंद्र जडेजाने माघारी धाडले. तर, डी कॉकने १६ चौकार आणि २ षटकारांसह १११ धावांची अफलातून खेळी करत भारतीय गोलंदाजांना हैराण केले. अश्विनने डी कॉकला बाद केले. या सामन्यात अश्विनने १२८ धावा देत पाच बळी मिळवले आहेत. दिवस संपला तेव्हा केशव महाराज ३ आणि सेनुरन मुथुसामी १२ धावांवर खेळत होते.
सलामीवीर रोहित शर्मा आणि मयंक अग्रवालच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताने पहिला डाव ७ बाद ५०२ धावांवर घोषित केला. त्यानंतर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्यांनी ३९ धावांवर ३ विकेट गमावल्या होत्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताच डीन एल्गार आणि उपकर्णधार टेंबा बावुमा आक्रमक खेळ खेळत होते. पण, इशांत शर्मा याने बावुमाला १८ धावांवर पायचीत पकडले आणि भारताला चौथे यश मिळवून दिले. भारताकडून अश्विनने पाच, रविंद्र जडेजाने दोन तर, इशांत शर्माने एक बळी घेतला आहे.
तत्पूर्वी, बिनबाद २०२ धावांवरून खेळ सुरू करताच रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली होती. रोहितने २४४ चेंडूंत २३ चौकार व ६ षटकार खेचून १७६ धावा केल्या, तर मयांकने ३७१ चेंडूंत २३ चौकार व ६ षटकारांसह २१५ धावा ठोकल्या.
धावफलक -
- भारत पहिला डाव - ५०२/७ (डाव घोषित)
- दक्षिण आफ्रिका पहिला डाव - ३८५/८* (केशव महाराज ३ आणि सेनुरन मुथुसामी १२ धावांवर खेळत आहेत)