नवी दिल्ली - यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून होणार आहे. यापूर्वी ही लीग 29 मार्चपासून होणार होती, पण कोरोनाव्हायरसमुळे ती पुढे ढकलण्यात आली. मात्र, युएईत पार पडणाऱ्या या लीगबाबत बीसीसीआयने फ्रेंचायझींना अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. त्यामुळे फ्रेंचायझीं गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एमिरेट्स बोर्ड (ईसीबी) कडे स्वीकृती पत्र पाठवले असल्याचे आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी रविवारी सांगितले आहे. पटेल म्हणाले, "हो, आम्ही स्वीकृती पत्र ईसीबीला पाठवले आहे आणि दोन्ही बोर्ड एकत्रितपणे स्पर्धा पूर्ण करण्यासाठी काम करतील."
याशिवाय, पटेल म्हणाले, ''मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांचे युएईमध्ये प्री-टूर्नामेंट प्रशिक्षण शिबिर आहेत.''
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलला गेल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाला. यंदाचे आयपीएल 26 सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी चर्चा होती. मात्र, ही स्पर्धा या तारखेच्या आठवडाभरापूर्वी व्हावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे, जेणेकरुन भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर परिणाम होऊ नये.