जुन्नर (पुणे) - तालुक्यातील जाधववाडी येथे टेनिस बॉल क्रिकेटचा सामना खेळत असताना, एका क्रिकेटपटूचे मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. स्वर्गीय मयुर चषक टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरु असताना ही घटना घडली.
स्वर्गीय मयुर चषक स्पर्धेत ओझर विरुद्ध जांबुत सामना सुरु होता. तेव्हा बाबू नलावडे या ४७ वर्षीय खेळाडूला हृदयविकाराचा झटका झाला. तो ओझर संघाकडून खेळत होता. हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो नॉनस्ट्रायकर एन्डला होता. यावेळी गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज असताना बाबू नलावडे खाली बसला आणि अचानक खाली कोसळला.
बाबू नलावडे जमिनीवर कोसळल्याचे पाहून अंपायरसह मैदानातील खेळाडू त्याच्याकडे धावले आणि त्याला नारायणगाव येथील एका खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र त्यापूर्वीच नलावडे याचे निधन झाले होते.
बाबू नलावडे हा टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत क्रिकेटपटू होता. त्यामुळे त्याच्या निधनाने सध्या जुन्नर तालुक्यात तसेच टेनिस क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, सराईत गुन्हेगारासह सहा जणांना अटक
हेही वाचा - पुण्यात कोरोनाची दहशत कायम; पालिका प्रशासन सज्ज