मुंबई - आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीची बैठक गुरूवारी पार पडली. परंतु या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंक स्पर्धेच्या भविष्याबाबत कोणताही निर्णय या बैठकीत घेता आला नाही. बीसीसीआयनेही या स्पर्धेबाबत शंका व्यक्त केली आहे. बीसीसायच्या अधिकाऱ्यांनुसार, कोरोना व्हायरसच्या परिणामांमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वर्ल्डकप होण्याची शक्यता नाही.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की बर्याच गोष्टींची काळजी घेतली जाईल. परंतु जेव्हा परिस्थिती सामान्य होईल तेव्हाच ही स्पर्धा शक्य होईल. हे अधिकारी म्हणाले, “खरं सांगायचं झालं तर ऑक्टोबरमध्ये टी -२० वर्ल्डकप होणं कठीण आहे. इतक्या लोकांना एकत्र करण्याबद्दल विचार करणेही अवघड आहे. एकदा वाहतूक सुरू झाली की याचा आढावा घेतला जाईल.”
ते पुढे म्हणाले, “इतक्या मोठ्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या लोकांची जबाबदारी सीए आणि आयसीसी घेईल का? हा प्रश्न आहे. मग सरकारच्या अटी येतील. ऑस्ट्रेलियन सरकार ही जोखीम घेऊ शकेल का, जर तसं असेल तर मंजुरीची वेळ काय आहे, तो काळ इतर बोर्डासाठी योग्य ठरेल का, आणि इतर देशांच्या सरकार त्यांच्या संघांना सोडण्याची परवानगी देतील का, असे प्रश्न आहेत.”