सुरत - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) भरवण्यात येणारी मुश्ताक अली टी-२० करंडक स्पर्धेत महाराष्ट्रापाठोपाठ मुंबईच्या संघाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला मुंबईचा संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही.
मुंबईचा साखळी फेरीतील अखेरचा सामना पंजाबविरुध्द झाला. हा सामना मुंबईने २२ धावांनी जिंकला. मात्र, निव्वळ धावगतीच्या शर्यतीत पिछाडीवर राहिल्यामुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात आले.
लालाभाई काँट्रॅक्टर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद २४३ धावा केल्या. यात कर्णधार सूर्यकुमार यादव (८० धावा), श्रेयस अय्यर (नाबाद ८०) आणि पृथ्वी शॉ (५७) या तिघांनी अर्धशतकी खेळी केली.
प्रत्युत्तरा दाखल पंजाबच्या संघाने चांगली लढत दिली. शुभमन गिल (७८) आणि अभिषेक शर्मा (४७) यांच्या झंझावाती फलंदाजीमुळे पंजाबने एक वेळ १४ षटकांतच १५४ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र ,हे दोघे बाद झाल्यानंतर पंजाबची धावगती मंदावली आणि त्यांना ६ बाद २२१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
मुंबईने या विजयासह खात्यात चार सामन्यांतून १२ गुण मिळवले. कर्नाटकचेही तितक्याच सामन्यात १२ गुण आहेत. मात्र, निव्वळ धावगती मुंबईपेक्षा सरस असल्यामुळे कर्नाटकने उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीतील सामने -
- हरियाणा विरुध्द कर्नाटक - २९ नोव्हेंबर
- तमिळनाडू विरुध्द राजस्थान - २९ नोव्हेंबर