नवी दिल्ली - भारतीय फलंदाज सुरेश रैनाने रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्होला 'क्वारंटाईन पार्टनर्स' म्हणून निवडले आहे. आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जच्या इन्स्टाग्रामवर रैनाने संवाद साधला. त्यावेळी त्याने ही प्रतिक्रिया दिली.
कोणते दोन खेळाडू क्वारंटाईन पार्टनर्स म्हणून आवडतील?, असा प्रश्न रैनाला विचारण्यात आला होता. तेव्हा चाहत्यांना धोनीचे नाव अपेक्षित होते. मात्र, रैनाने जडेजा आणि ब्राव्होचे नाव घेतले. जडेजाची स्तुती करत रैना म्हणाला, ''जडेजा एक रंजक आणि मजेदार व्यक्ती आहे. मला त्याच्या फार्महाऊसवर त्याच्यासोबत क्वारंटाईन होण्यास आवडेल. जेणेकरून मी तिथे घोडेस्वारी शिकू शकेन.''
जेव्हा रैनाला परदेशी खेळाडूचे नाव विचारले गेले, तेव्हा त्याने ड्वेन ब्राव्होला निवडले. रैना म्हणाला, ''तो तुम्हाला नेहमी आनंदी ठेवेल. गाणी गात राहील. ब्राव्हो डान्स करून तुमचे पूर्ण मनोरंजनही करेल. तो सकारात्मक स्वभावाचा माणूस आहे.''
भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी 52 लाख रुपयांची मदत दिली आहे. रैनाने पंतप्रधान मदत निधीला 31 लाख आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीला 21 लाख रुपये देऊ केले आहेत.