मुंबई - भारतीय संघातून दीर्घकाळासाठी बाहेर असलेल्या सुरेश रैनाने टी-ट्वेन्टीत नवीन विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी स्पर्धेत रैनाने पुद्दुचेरी विरुद्ध केवळ १२ धावा केल्या असल्या तरी रैनाने टी-ट्वेन्टीत ८ हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला आहे.
डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने ३०० टी-ट्वेन्टी सामन्यात ३३.४७ च्या सरासरीने ८००१ धावा बनवल्या आहेत. भारतीय फलंदाजात धोनीनंतर केवळ रैनानेच ३०० टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत. सुरेश रैना टी-ट्वेन्टीत सर्वाधिक धावा बनवण्याच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बाबतीत रैना पहिल्या क्रमांकावर आहे. रैनाने १७२ डावात ४९८५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर १ शतक आणि ३५ अर्धशतके आहेत. आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी रैनाला केवळ १५ धावा करायच्या आहेत.
टी-ट्वेन्टीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
ख्रिस गेल - १२ हजार २९८ धावा
ब्रेंडन मॅक्कुलम - ९ हजार ९२२ धावा
कायरन पोलार्ड - ८ हजार ८३८ धावा
शोएब मलिक - ८ हजार ६०३ धावा
डेव्हिड वॉर्नर - ८ हजार १११ धावा
सुरेश रैना - ८ हजार ००१ धावा