मुंबई - क्रिकेटच्या इतिहासात १० हजार धावा करण्याचा विक्रम अनेक खेळाडूंनी केला. पण सुनील गावस्कर यांनी या विक्रमावर पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. त्या घटनेला आज ३२ वर्ष पूर्ण होत आहेत. ७ मार्च १९८७ रोजी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर त्यांनी पाकिस्तानचा गोलंदाज इजाज फाकिह यांच्या चेंडूवर १ धावा काढत हा कारनामा केला. लिटल मास्टर यांच्या या पराक्रमांनतर स्टेडियममधल्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेत एकच जल्लोष केला होता. त्यामुळे जवळपास २० मिनिटांसाठी खेळ मध्येच थांबवावा लागला होता. त्या सामन्यात गावस्कर यांनी ६३ धावांची खेळी केली होती.
सुनील यांनी १२५ कसोटीत ३४ शतके आणि ४५ अर्धशतकांसह १० हजार १२२ धावा केल्यात. त्याची सरासरी ५१.१ इतकी होती. त्यात नाबद २३६ ही सर्वोच्च धावसंख्या केली होती.
संयमी मात्र नजाकतभऱ्या शैलीनं गावस्कर यांनी एक दशक क्रिकेट रसिकांच मनोरंजन केलं. तो काळही जलदगती गोलंदाजांचा होता. त्यांच्या समोर एंडी रॉबर्ट्स, माल्कम मार्शल, इम्रान खान, जोएल गार्नर, डेनिस लिली, जेफ थॉमरसन या सारख्या एकापेक्षा एक खतरनाक गोलंदाजांचा तोफखाना असायचा. मात्र त्यांच्या समोरही ते विना हेल्टमेट एका अभेद्य भिंती सारखे उभे रहायचे. त्यांनी एका मागोमाग एक विक्रम केले. जगात आपला एक ठसा उमटवला. ज्या काळात गोलंदाजांचा दबदबा होता, त्याच काळात गावस्करांनी स्वताचा फलंदाज म्हणून जगभर धाक निर्माण केला होता. त्यांची ही कामगिरी क्रिकेट जगत नेहमीच स्मरणात ठेवेल.