सिडनी - तीन महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ मैदानात परतला आहे. स्मिथने सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
"नेट्समध्ये तीन महिन्यांत प्रथमच. चांगली बातमी. बॅट कशी धरायची ते आठवते", असे स्मिथने इंस्टाग्रामवर म्हटले. कोरोना व्हायरसमुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद आहे. मात्र कोरोनाचे संकट नसते तर, स्मिथने यावेळी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व केले असते.
यावर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. परंतु कोरोनामुळे या स्पर्धेवर टांगती तलवार आहे. या स्पर्धेशिवाय, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. येथे दोन्ही संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळतील.
- View this post on Instagram
First hit in the nets in 3 months. Good news... I remembered how to hold the bat 😂
">
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उभय संघातील पहिल्या कसोटी सामन्याला 3 डिसेंबरपासून सुरुवात होईल. हा सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला अॅडलेड येथे दुसरा, 26 डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि 3 जानेवारी 2021 मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ विदेशी खेळपट्टीवर आपला पहिला 'डे-नाईट' कसोटी सामना खेळणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) 3 ते 7 जानेवारी 2021 ला हा सामना रंगणार आहे.