सिडनी - ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथवरची कर्णधारपदावरील दोन वर्षाची बंदी संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता त्याच्या कर्णधारपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे जगाची गती मंदावली असून क्रीडाक्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे.
सिडनीतील रिकाम्या क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध स्मिथने आपला शेवटचा सामना खेळला होता. कोरोना व्हायरसमुळे ही तीन सामन्यांची मालिका नंतर रद्द करण्यात आली.
२०१८मध्ये बॉल टेम्परिंग केल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि त्याच्या नेतृत्त्वावर दोन वर्षांसाठी बंदी घातली होती. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केपटाऊन येथे झालेल्या तिसर्या कसोटी सामन्यादरम्यान, बेनक्राफ्टला चेंडूमध्ये छेडछाड करण्यास सांगितले असल्याचे स्मिथने कबूल केले होते.
स्मिथ आणि बेनक्राफ्टसह डेव्हिड वॉर्नरलाही उपकर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बेनक्राफ्टला नऊ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. बंदी संपल्यानंतर, स्मिथ आणि वॉर्नरने दमदार पुनरागमन केले होते.