बर्मिंघहॅम - चेंडू छेडछाड प्रकरणी शिक्षा भोगून संघात परतलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथने विक्रमांचा धडाका लावला आहे. त्याने इंग्लंडविरुध्दच्या पहिल्याच कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतक ठोकले. असा पराक्रम करणारा तो अॅशेसच्या इतिहासातील पाचवा खेळाडू ठरला. याबरोबरच त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचाही एक विक्रम मोडीत काढला आहे.
कसोटी सामन्यात खेळताना स्टिव स्मिथने सर्वात कमी डावांमध्ये २५ शतके ठोकत विराट कोहलीला मागे टाकले आहे. स्मिथ हा कारनामा ११९ डावांमध्ये केला आहे. तर विराटने १२७ डावांमध्ये २५ शतके केली आहेत. दरम्यान, सर्वात कमी डावांमध्ये २५ शतके ठोकण्याचा विश्वविक्रम सर डॉन ब्रॅडमॅनच्या नावावर आहे. त्यांनी ६८ डावांमध्ये २५ शतके ठोकली आहे.
स्मिथने अॅशेसच्या पहिल्या कसोटी सामन्याचा दोन्ही डावात शतकी खेळी आहे. त्याने पहिल्या डावात १४४ आणि दुसऱ्या डावात १४२ धावा केल्या आहेत. दरम्यान, स्मिथने अॅशेसमध्ये खेळताना आतापर्यंत १० शतके केली आहेत. त्याच्या पुढे ब्रॅडमॅन (१९ शतके) आणि इंग्लंडचे जॅक हॉब्ज (१२ शतके) हे आहेत.