कोलंबो - एकेकाळी जगातील अव्वल संघापैकी एक गणल्या जाणाऱ्या श्रीलंका संघाची क्रिकेटच्या मैदानात आणि बाहेर बिकट अवस्था झाली आहे. आयसीसीने श्रीलंकेच्या संघावर मॅच फिक्सिंगचे आरोप लावले आहेत. दुसरीकडे संघातील खेळाडूंमध्ये सुद्धा धुसफुस सुरू आहे.
श्रीलंका संघातील वातावरण इतके बिघडले आहे, की संघातील खेळाडू एकमेकांशी बोलतदेखील नाहीत. यातच, श्रीलंका संघाचा कर्णधार लसिथ मलिंगाची पत्नी आणि अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा यांच्यात वाद झाला आहे.
काय आहे प्रकरण?
मलिंगाच्या पत्नीने परेरावर गंभीर आरोप लावताना संघात जागा मिळवण्यासाठी परेरा देशाच्या क्रीडामंत्र्यांना भेटला होता, असे ट्वीट केले होते. यावर प्रत्युत्तर देताना परेराने फेसबुकवर पोस्ट करत २०१८ साली त्याच्या कामगिरी सांगितली होती. या प्रकारानंतर संघातील वातावरण कमालीचे ढासळले आहे.
परेरा फेसबुकवर पोस्ट करण्याशिवाय श्रीलंकेचे क्रिकेट अधिकारी अॅश्ले डिसिल्वा यांनी पत्रदेखील लिहिले, की जेव्हा संघाच्या कर्णधाराच्या पत्नीकडून असे गंभीर आरोप लावले जातात, त्यावेळी नागरिक त्यांच्यावरच विश्वास ठेवतील. त्यांना यावर विश्वास न ठेवण्यापासून परावृत्त करणे अवघड आहे. यामुळे संघातील वातावरण बिघडले आहे. शिवाय श्रीलंका संघ देशासाठी चेष्टेचा विषय बनली आहे.