कोलंबो - श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) कोलंबोमधील 40,000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या नवीन क्रिकेट स्टेडियमचे बांधकाम थांबवले आहे. एका अहवालानुसार सरकारने आपले पाऊल मागे घेतल्यानंतर हे काम थांबवण्यात आले आहे.
बोर्डासमवेत श्रीलंका सरकार देशातील सर्वात मोठे स्टेडियम बनवण्याचा विचार करत होते. हे स्टेडियम तयार करण्यासाठी श्रीलंकेला तीन-चार कोटी डॉलर्स खर्च करावा लागणार होता. माजी कर्णधार महेला जयवर्धने आणि आयसीसीचे माजी मॅच रेफरी रोशन महानामा यांच्यासह अनेक दिग्गजांनी देशातील नवीन स्टेडियमच्या बांधकामाला विरोध दर्शवला. या विरोधामुळे सरकारला ही योजना मागे घ्यावी लागली, असे सांगण्यात येत आहे.
सरकारच्या उच्चस्तरीय समितीने गुरुवारी जयवर्धने, महानामा, कुमार संगकारा, लसिथ मलिंगा आणि सनथ जयसूर्या यांच्यासमवेत बैठक घेतली. ही बैठक संपल्यानंतर स्टेडियमचे बांधकाम थांबवण्याचे जाहीर करण्यात आले.
एसएलसीला आगामी विश्वचषक आणि आयसीसी स्पर्धा आयोजित करण्यासाठी नवीन स्टेडियम बांधायचे होते. जयवर्धनेने नवीन स्टेडियमच्या आवश्यकतेवर प्रश्न उपस्थित केला होता. "सध्याच्या स्टेडियममध्ये आपण जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि घरगुती क्रिकेटदेखील खेळत नाही. आपल्याला आणखी एक स्टेडियम हवे आहे का?", असा प्रश्न जयवर्धनेने उपस्थित केला होता.
श्रीलंकेकडे सध्या कॅंडी, गॅले, कोलंबो, हंबनटोटा, डम्बुला आणि पॅल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहेत.