कोलंबो - श्रीलंकेचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक डेव्हिड सेकर यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) माजी जलदगती गोलंदाज चमिंडा वासच्या हाती प्रशिक्षकपदाची सुत्रे सोपवली आहेत. वास सध्या एसएलसीच्या उच्च कामगिरी केंद्रात 'वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक' म्हणून कार्यरत आहे.
वासने श्रीलंकेकडून १११ सामन्यांत ३५५ कसोटी विकेट आणि ३२२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४०० बळी घेतले आहे. ३ मार्चपासून श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्याला प्रारंभ करेल. लंकेचा संघ २३ फेब्रुवारी रोजी कॅरेबियनला रवाना होईल. या दौर्यादरम्यान, श्रीलंका ३ मार्च ते २ एप्रिल दरम्यान अँटिगामध्ये जैव-सुरक्षित वातावरणात राहील.
उभय संघात तीन टी -२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. टी -२० चे तीन सामने ३, ५ आणि ७ मार्च रोजी कूलिज क्रिकेट ग्राउंड, अँटिगा येथे, तर एकदिवसीय मालिका १०, १२ आणि १४ मार्च रोजी सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट स्टेडियम खेळली जाईल.
दोन्ही संघांतील पहिली कसोटी २१ मार्चपासून आणि दुसरी कसोटी २९ मार्चपासून सुरू होईल.
हेही वाचा - VIDEO : टीम इंडियाच्या 'स्पायडरमॅन'चा नवा अंदाज पाहिला का?