शारजाह - सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने मुंबईविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारला 'रिप्लेस' केले. या सामन्यात कौल महागडा ठरला. मुंबईच्या फलंदाजांनी त्याच्या षटकात अनेक धावा वसूल केल्या. या हंगामात तो आतापर्यंत सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.
कौलचा हा सामना या मोसमातील पहिला सामना होता. त्याने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ६४ धावा दिल्या. या विक्रमात त्याने डेल स्टेनला मागे टाकले. या हंगामात स्टेनने दुबईमध्ये पंजाबविरुद्ध चार षटकांत ५७ धावा दिल्या होत्या. कौलने मुंबईविरुद्ध चार षटकांत ६४ धावा दिल्या आणि दोन बळी घेतले. कौलने पहिल्या षटकात १९ आणि शेवटच्या षटकात २१ धावा दिल्या. त्याने सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांना बाद केले.
शारजाहमध्ये मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद २०८ धावा काढल्या. कृणाल पांड्याने शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी केली. त्याने केवळ ४ चेंडूंचा सामना करत ५००च्या स्ट्राइक रेटने २० धावा केल्या.
आयपीएल २०२०मध्ये महागडे गोलंदाज - (४ षटके)
- सिद्धार्थ कौल - ६४ धावा, २ बळी.
- डेल स्टेन - ५७ धावा, शून्य बळी.
- ख्रिस जॉर्डन - ५६ धावा, शून्य बळी.
- लुंगी एनगिडी - ५६ धावा, १ बळी.
- पीयूष चावला - ५५ रन, १ बळी.