नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने सध्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीची तंदुरुस्ती आणि खेळाच्या क्षेत्रातील आक्रमकपणाबद्दल कौतुक केले आहे. श्रीशांत म्हणाला, की विराटने टीम इंडियामधील खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी प्रभावी निकष लावले आहेत. याचाच परिणाम म्हणून टीम इंडियामध्ये फिटनेस आता पहिल्या क्रमांकावर आहे. संघातील प्रत्येक खेळाडू आपल्या फिटनेसबाबत गंभीर आहे.
श्रीशांतने एका अॅपशी केलेल्या संवादादरम्यान टीम इंडियाच्या फिटनेसबद्दल सांगितले. तो म्हणाला, ''आक्रमकपणाबाबत विराटची स्वतःची एक शैली आहे. आजच्या टीम इंडियामध्ये, मग विराट कोहली असो किंवा कुलदीप यादव, सर्व खूपच आक्रमक आहेत. पण मला वैयक्तिकरित्या अनिल कुंबळेची शैली अधिक आवडते. नियंत्रित राहून आक्रमकता दर्शवणे.''
तो पुढे म्हणाला, ''स्वत: ला तंदुरुस्त ठेवणे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. मी माझ्या वडिलांसह आणि माझ्या चुलतभावांसोबत सुरुवातीपासूनच फिटनेसवर काम करत आहे. यानंतर मी प्रशिक्षक साई कृपाणींना भेटलो. ते दक्षिण भारत झोनचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांनी आम्हाला तंदुरुस्तीचे महत्त्व सांगितले.''