लखनौ - सलामीवीर एनी बॉश (नाबाद ६६) आणि कर्णधार सून लूस (४३) यांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने तीन सामन्याच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाची नियमीत कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकली नव्हती.
आफ्रिकेच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून, भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. तेव्हा भारतीय महिला संघाला २० षटकात ६ बाद १३० धावांपर्यंत मजल मारता आली. यात भारतीय संघाकडून हर्लिन देओलने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. तसेच जेमिमा रोड्रिग्ज हिने २७ चेंडूत ३ चौकारासह ३० धावांचे बहुमूल्य योगदान दिले. स्मृती मानधाना (११) आणि शेफाली वर्मा (२२) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्या.
भारताने दिलेल्या १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एनी बॉश हिने अष्टपैलू कामगिरी करत ४८ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. तसेच त्यापूर्वी गोलंदाजी करताना तिने २ महत्वपूर्ण गडी देखील बाद केले होते. बॉश बाद झाल्यानंतर लुसने ४३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. उभय संघातील दुसरा सामना २१ मार्चला होणार आहे.
हेही वाचा - Ind vs Eng ५th T२० : भारताने अंतिम सामन्यासह मालिका ३-२ ने जिंकली
हेही वाचा - NZ Vs Ban १st ODI : न्यूझीलंडचा बांगलादेशवर ८ गडी राखून विजय; बोल्टचे ४ बळी