नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आगामी विश्वचषक स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी रिषभ पंत योग्य असल्याचे समर्थन केले आहे. अलीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात पंतला स्थान देण्यात आले होते. या दोन्ही सामन्यात आपल्या ढिसाळ यष्टीरक्षणामुळे तो टीकेचा धनी ठरला होता. पंतने फलंदाजी करताना चौथ्या सामन्यात ३६ तर पाचव्या सामन्यात १६ धावा केल्या होत्या.
मंगळवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत गांगुलीने सांगितले की, पंतने कसोटीत आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जर पतंला फलंदाजीस वरच्या स्थानी खेळवल्यास तो तिथेही चांगली फलंदाजी करू शकतो.
मागील आयपीएल स्पर्धेत त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये तो एक यशस्वी फलंदाज आहे. मला सांगा की, असे किती भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज आहेत, ज्यांनी पंतप्रमाणे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत शतक झळकावले आहे.
गांगुली पुढे म्हणाला, की मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पंतला जास्त संधी मिळाली नाहीय, जेव्हा संधी मिळालीय तेव्हा त्याला लोव्हर ऑर्डरमध्ये फलंदाजी करावी लागली. मात्र विश्वचषक स्पर्धेत पंतला वरच्या स्थानी फलंदाजीची संधी मिळाल्यास तो नक्कीच यशस्वी होईल.