मेलबर्न - भारतीय संघाने पहिला दिवस-रात्र कसोटी सामना बांगलादेश विरुध्द खेळला. २०२१ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने एक नव्हे तर दोन कसोटी सामने प्रकाशझोतात खेळा, अशी मागणी ऑस्ट्रेलियाकडून होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या या मागणीला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जवळपास नकार दर्शवला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ जानेवारीत मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे. त्यावेळी संघाबरोबर ईराल एडिंग्ज यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे एक प्रतिनिधी मंडळही भारतात येणार आहे. या मंडळाने भारतीय संघाने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळावे, अशी मागणी केली आहे. हा प्रस्ताव ऑस्ट्रेलियाकडून मांडण्यात आला आहे. मात्र, याला सौरव गांगुलींनी नकार दर्शवला आहे.
याविषयी बोलताना गांगुलीने सांगितले की, 'मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून अजून अधिकृतपणे असे काही ऐकलं नाही. पण चार सामन्यांच्या मालिकेत दोन सामने प्रकाशझोतात खेळणे म्हणजे जास्त होतं. पारंपरिक क्रिकेटला छेद देणे योग्य नाही. पण प्रत्येक कसोटी मालिकेत एक सामना प्रकाशझोतात खेळणे ठीक असेल.'
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्टस् यांनीही काही दिवसांपूर्वी चारपैकी दोन सामने प्रकाशझोतात खेळण्याबाबच विचार मांडले होते. भारताबरोबर आम्हाला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायला आवडेल आणि ते शक्य झाल्यास एकपेक्षा दोन सामने प्रकाशझोतात होऊ शकतील, असे रॉबर्टस् म्हणाले होते.
हेही वाचा - टीम इंडियाच्या गचाळ क्षेत्ररक्षणावर भडकला युवराज म्हणाला ही तर...
हेही वाचा - अंजली चंदची अविश्वसनीय कामगिरी...! दोन टी-२० सामन्यात १ धाव देत केले १० गडी बाद